पुरंदर रिपोर्टर Live
शिरूर : प्रतिनिधी.
शिरूर तालुक्यातील आंबळे परिसरातील सोनखिळा वस्ती येथे गुरुवारी (दि. ५ जून) पहाटेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे या दरम्यान चोरट्यांनी घरातील शेतकरी दाम्पत्याला मारहाण करत जबरदस्तीने दागिने हिसकावून नेल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या प्रकरणी रमेश ज्ञानदेव फुलपगर (वय ५४, रा. आंबळे-सोनखिळा वस्ती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे १.४५ वाजता चार अज्ञात चोरट्यांनी फुलपगर यांच्या घराचा बंद दरवाजा लोखंडी हत्याराच्या सहाय्याने उघडला. चोरट्यांनी तोंडावर रूमाल बांधले होते, तसेच त्यांच्या हातात लाकडी काठ्या व धारदार शस्त्रे होती.
घरात शिरताच चोरट्यांनी रमेश फुलपगर यांना काठीने पायावर मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी ललिता फुलपगर यांच्या गळ्यातील, कानातील व पायातील सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. कपाटातील रोख रक्कम ₹२५,००० सह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ₹१,६७,००० चा ऐवज चोरून नेण्यात आला.
ही घटना घडताना शेजाऱ्यांना कळण्याआधीच चोरटे पसार झाले. या प्रकारामुळे संपूर्ण आंबळे व सोनखिळा वस्ती परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
0 Comments